विमानतळ विस्तारीकरणासाठी २०० एकर जागेची आवश्यकता   

२५ एकर संरक्षण विभागाची, तर ६५ एकर खासगी जागेबाबत बोलणी

पुणे : पुढील शंभर वर्षांचा विचार करून विमानतळाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यासाठी २०० एक्कर जागेची आवश्यकता आहे. त्यातील २५ एक्कर जमीन सरंक्षण विभागाकडून घेण्यात येणार आहे, तर ६५ एक्कर खासगी जागेचे हस्तांतरण करण्यात येणार आहे. उर्वरित आवश्यक जागेसाठी चर्चा सुरू असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 
 
लोहगाव येथील नव्या विमानतळावर काल मोहोळ यांच्या हस्ते उड्डाण यात्री कॅफे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. विमानतळ विस्तारीकरणासाठी तेथेच सरंक्षण विभागाची उपलब्ध असलेल्या २५ एक्कर जमिनीची मागणी करण्यात आली आहे. त्या बद्दल्यात सरंक्षण विभागाला दुसरीकडे जागा दिली जाणार आहे. या मागणीला सरंक्षण विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विस्तारीकरणात धावपट्टीची लांबी वाढविली जाणार आहे. विमानतळाच्या शेजारचा रस्ता विमानतळ परिसरात येणार आहे. त्या रस्त्याला पर्यायी रस्ता तयार करावा लागणार आहे. तसेच कार्गोसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार असल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले. 
 
पुणे विमानतळावरून वर्षाला १० लाख प्रवासी प्रवास करतात. नव्या विमानतळावर ३४ तपासणी केंद्र आहेत. डीजी यात्रासारखे स्वयंतपासणी व्यवस्था आहे. जुन्या विमानतळाच्या नुतनीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. तेथे १४ तपासणी केंद्र आहेत. त्यात आणखी ३४ कतपासणी केंद्राची वाढ केली जाणार आहे. त्यामुळे दोन्ही विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांत १४ ते १५ लाखाने वाढ होणार आहे. नव्या विमानतळामुळे उड्डाणांच्या संख्येत ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच कार्गो सेवेत ८.८५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुणे-भोपाळ, त्रिवेद्म, चेन्नई, देहराडून, अहमदाबाद या मार्गावर विमान सेवा वाढली असल्याचेही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. 

वर्षभरात दीड कोटी प्रवाशांचा प्रवास 

उड्डाण योजनेअंतर्गत विमानाच्या माध्यमातून छोटी शहरे मोठ्या शहरांना जोडली जात आहेत. मागील वर्षाभरात या योजनेअंतर्गत १.५ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही योजना पुढील १० वर्षे सुरूच असणार आहे. येत्या पाच वर्षांत या योजनेतंर्गत सुमारे ४ कोटी प्रवासी विमान प्रवास करतील, असा विश्वासही मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केला. 

उड्डाण यात्री कॅफेचे उद्घाटन 

विमान प्रवाशांना विमानतळावर पिण्याच्या पाणी, चहा, कॉफी, वडापाव स्स्तात मिळावा, यासाठी उड्डाण योजनेअंतर्गत नव्या विमानतळावर उड्डाण यात्री कॅफे सुरू करण्यात आला आहे. या कॅफेचे उद्घाटन मुरलीधर मोहोळ यांनी केले. या कॅफेमध्ये वडापाव २० रूपये, पाणी बॉटल १० रूपये आणि चहा १० रूपयाला मिळणार आहे. विमानतळामध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला हा कॅफे आहे. हा कॅफे २४ तास खुला असणार आहे. 

विमानतळापर्यंत मेट्रो सेवा 

शहरात मेट्रो सेवेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात शहराच्या कोणत्याही भागातून विमानतळापर्यंत येता यावे, यासाठी मेट्रोचे जाळे विमानतळापर्यत जोडले जाणार आहेत. खडकवासला ते खराडी मेट्रो मार्ग आहे. हा मार्ग पुढे विमानळाला जोडण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासंदर्भात बोलणी सुरू आहे. तसेच विमानतळ परिसरापर्यंत पीएमपी सेवेबद्दलही विमानतळ प्रशासनाशी बोलणी सुरू असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. 
 

Related Articles